केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या रोखठोकपणासाठी आणि स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच त्यांच्या वक्तव्यांची कायमच चर्चा होत असते. नितीन गडकरींनी नागपूरमध्ये केलेल्या एका कार्यक्रमातलं वक्तव्यही आता चर्चेत आलं आहे.
तरुण असताना नक्षलवादी चळवळीत होतो आणि त्यानंतर ते उदाहरण देऊन गोळ्या घालण्याची धमकी दिली होती असा एक किस्सा नितीन गडकरींनी सांगितला आहे. मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा हा किस्सा आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी?
डॉ. पी. सी. आलेक्झांडर हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. त्यावेळी मी राजदूत घेऊन मेळघाटातल्या गावांमध्ये फिरलो. परिस्थिती खूप वाईट होती. फॉरेस्टवाले काम करु देत नव्हते. त्यावेळी एक आयुक्त होते, ते नांदेडचे होते. त्यांचं आडनाव होतं कुलकर्णी. सगळ्या वन अधिकाऱ्यांना सांगायचे की नीट लक्ष द्या, परिस्थिती गंभीर आहे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यांच्याकडेही आम्ही प्रश्न नेला की रस्ता बांधू दिला जात नाही. वन खात्याकडून अडचणी येत आहेत. मनोहर जोशीही खूपच सुसंस्कृत होते. मला वाटायचं की हे काही बोलतच नाहीत. मनोहर जोशी यांनी त्यावेळी वन अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि म्हणाले तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का? कुपोषणाचा प्रश्न आहे तरीही तुम्ही संमती देत नाही. त्यांनी इतकं सांगूनही काही घडलं नाही. मग मी त्यांना म्हटलं आता हा विषय माझ्यावर सोडून द्या.” असं गडकरी म्हणाले.
वनाधिकाऱ्यांना सांगितलं मी एकेकाला गोळ्या..
त्यानंतर नितीन गडकरी म्हणाले, “मी सगळ्या वनाधिकाऱ्यांना सांगितलं मी चुकून राजकारणात आलो. मी माझ्या तरुण वयात नक्षली चळवळीतच गेलो होतो. पण पुन्हा एकदा जाईन आणि तुम्हाला गोळ्यांनी फोकल्याशिवाय नाही राहणार. त्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून जे काही करुन घेतलं ते मी सांगू शकत नाही. त्यानंतर वेगाने रस्त्याचं काम झालं. सगळे रस्ते पूर्ण झाले.” असं नितीन गडकरी म्हणाले.