उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी जेव्हा आपण कारमध्ये बसतो, तेव्हा आतलं तापमान एखाद्या गरम भट्टीसारखं असतं. अशा वेळी आपण लगेच एसी सुरू करतो आणि तो जास्तीत जास्त थंड होईल याची वाट पाहतो. पण, कारच्या डॅशबोर्डवर एक असं बटण असतं, ज्यावर कारच्या चित्रात गोल फिरणारा बाण असतो.
अनेक ड्रायव्हर्सना वाटतं की हे बटण फक्त डिझाइनसाठी आहे किंवा ते नेहमीच सुरू ठेवावं. परंतु, हे बटण कधी सुरू करावं आणि कधी बंद करावं, यावर तुमचा प्रवासाचा आनंद आणि खिशावर पडणारा भार अवलंबून असतो.
हे बटण केवळ तुमची कार लवकर थंड करत नाही, तर इंधनाची बचत करण्यातही मोठी मदत करतं. चला तर मग, या बटणाचा नेमका वापर कधी आणि कसा करावा, हे सविस्तर जाणून घेऊया. नेमकं कधी दाबावं हे 'Air Recirculation' बटण? हे बटण वापरण्याची योग्य वेळ तुमच्या प्रवासाचा दर्जा सुधारू शकते.
खालील परिस्थितीमध्ये हे बटण नक्की वापरा. जेव्हा कार झटपट थंड करायची असेल: उन्हात उभी असलेली कार सुरू केल्यानंतर आधी 1 ते 2 मिनिटे खिडक्या उघड्या ठेवा. त्यानंतर खिडक्या बंद करून 'एअर रिक्र्युलेशन' मोड सुरू करा.
यामुळे एसी बाहेरील गरम हवा आत घेण्याऐवजी कारमधील आधीच थंड झालेली हवा पुन्हा पुन्हा फिरवतो. परिणामी, कॅबिन अत्यंत वेगाने थंड होते
ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना जेव्हा तुम्ही सिग्नलवर किंवा ट्रॅफिक जाममध्ये असता, तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या गाड्यांमधून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडत असतो. अशा वेळी हे बटण सुरू केल्यास बाहेरील दूषित हवा आणि सायलेन्सरचा धूर कारच्या आत येत नाही.
बाहेरील दुर्गंधी टाळण्यासाठी रस्त्याने जाताना एखाद्या खताचा कारखाना किंवा कचरा कुंडी यांसारख्या दुर्गंधीयुक्त ठिकाणावरून प्रवास करताना हे बटण वरदान ठरतं. दुर्गंधी असलेल्या ठिकाणी पोहोचण्याआधीच हे बटण दाबल्यास कारमध्ये ताजी आणि शुद्ध हवा टिकून राहते.
अॅलर्जी आणि 'हे फिव्हर'चा त्रास असल्यास बाहेरील हवेत मोठ्या प्रमाणावर परागकण (Pollen) आणि धुळ असते. जर तुम्हाला अॅलर्जीचा त्रास असेल, तर हे बटण बाहेरील हवा आत येण्यापासून रोखते, ज्यामुळे तुमचा प्रवास शिंका किंवा त्रासाशिवाय सुखकर होतो.
यामुळे तुमचे पैसे कसे वाचतात?
हे बटण केवळ सोयीसाठी नाही, तर ते आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर आहे: इंधनाची बचत जेव्हा एसीला बाहेरील गरम हवा सतत थंड करावी लागत नाही, तेव्हा इंजिनवरचा ताण कमी होतो. यामुळे गाडीच्या मायलेजमध्ये सुधारणा होते. कमी मेंटेनन्स: एसी युनिटला कमी कष्ट करावे लागल्यामुळे त्यातील गॅस लवकर संपत नाही.
यामुळे एसी री-गॅसिंगचा 5,000 ते 20,000 रुपयांचा खर्च लांबणीवर पडतो. प्रवासात थकवा जाणवल्यास: जर तुम्ही दीर्घ प्रवासाला निघाला असाल, तर सतत तीच हवा फिरत राहिल्याने ऑक्सिजनचं प्रमाण थोडं कमी होऊन तुम्हाला डुलकी किंवा थकवा जाणवू शकतो. अशा वेळी मधूनच फ्रेश एअर मोड सुरू करावा.