तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका ! भेसळीसाठीचा  ''इतक्या'' लाखांचा साठा जप्त
तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका ! भेसळीसाठीचा ''इतक्या'' लाखांचा साठा जप्त
img
Nandini khandare More

 तुकाराम मुंढे यांनी सध्या राज्यभरात कारवाईचा धडाका सुरु केले असून भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मुंढे यांनी राज्यभरातील अनेक हॉटेल्सचे परवाने रद्द करून कारवाई केलेली आहे. आता पुन्हा एक मोठी बातमी समोर येत आहे. दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत राज्यातील विविध ठिकाणी छापे टाकत तब्बल 43 लाख 31 हजार रुपयांचा संशयित भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. यासोबतच अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने 6 आणि 7 जुलै रोजी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत 14 हजार 64 किलो दुग्धजन्य पदार्थ आणि 24 हजार 632 लिटर संशयित भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. दूध भेसळीच्या प्रकरणात भारतीय न्याय संहितेसह अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.


पुणे विभागातही मोठी कारवाई करण्यात आली. दौंड तालुक्यातील क्रीमी डिलाईट येथे सुमारे 13 लाख 88 हजार रुपयांचे बटर आणि स्किम्ड मिल्क पावडर जप्त करण्यात आले. तर आंबेगाव तालुक्यातील शिंगवे (परगाव) येथील अथर्व मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स इंडस्ट्रीज येथे 9 हजार 498 लिटर संशयित भेसळयुक्त गायीचे दूध जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आले.

याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथेही 7 हजार 634 लिटर संशयित भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले असून संबंधित परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, 3 ते 6 जुलैदरम्यान राज्यातील 82 हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 33 आस्थापनांना सुधारणा नोटिसा, तर 9 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ही विशेष मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, संशयास्पद अन्नपदार्थांची माहिती नागरिकांनी तातडीने प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group