गेल्या अनेक दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरात धडक कारवाई सुरु आहेत. तुकाराम मुंढे यांच्या सरळ स्पष्ट आणि शिस्तबद्ध स्वभावामुळे ते अनेकदा चर्चेत असतात. दरम्यान आता पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्या पासून खाद्यपदार्थात भेसळ आणि स्वच्छतेची गय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अमरावती इथल्या एका कार्यक्रमात नागपुरातील प्रसिद्ध सावजी जेवणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. “मी सावजी खाल्ला तर एक महिना आजारी पडेन”, असं ते म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आणि त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटल्या. “जगातील अनेक देशात सावजीची मागणी केली जाते. त्यांच्या व्यवसायाला बळीचा बकरा करू नका. घरातील जेवण रेस्टॉरंटमध्ये आणलं जात आहे,” अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. त्यानंतर आता एका पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत “माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही”, असं म्हटलंय.
काय म्हणाले तुकाराम मुंढे?
“तुम्ही माझं वक्तव्य पुन्हा ऐका. सावजी मी खाल्लं तर महिनाभर आजारी पडेन, असं मी म्हटलं होतं. यात दुसऱ्यांनी खाल्ल्यावर ते आजारी पडतील किंवा कुणी खा, नका खाऊ असं काहीच म्हटलेलं नाही. यामागचं कारणही मी तुम्हाला सांगतो. 2008-09 मध्ये एका मित्राने मला बळजबरी ओढून सावजी खाण्यासाठी नेलं होतं. पण ते लाल आणि भरपूर तेल पाहून मी घास खाऊनच उठलो. मला ते खूप तेलकट आणि तिखट वाटलं. पण मी कुणी खाऊ नये असं म्हटलेलं नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्यावर माफीचा प्रश्नच येत नाही,” असं तुकाराम मुंढे म्हणाले.
नागपुरातील लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हटलं की ‘सावजी मटण’ हे नाव प्रत्येकाच्या तोंडी असतंच. नागपूर, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सावजी मटणाची लोकप्रियता आहे. सावजी ही विदर्भाची खाद्यसंस्कृती आणि समाजाची ओळख आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. सावजी मटणाची खरी ओळख म्हणजे त्यातील मसाले आणि चव. ‘सावजी’ हा शब्द सावजी समाजाच्या पाककलेशी जोडला जातो. अतिशय तिखट, सुगंधी आणि गडद रंगाचा मसाला, ही याची खासियत. धणे, खोबरं, खसखस, काळी मिरी, दालचिनी, लवंत, दगडफूल, वेलची यांसारखे गरम मसाले भाजून हा मसाला तयार केला जातो.