ज्यातील प्रशासनामध्ये मोठे फेरेबदल करण्यात आले असून 10 बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. धडाडीचे आयएएसस अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची देखील बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात काम करत असताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून अधिकारी झालेल्यांवर कारवाईचा सपाटा लावला होता. त्यामध्ये अनेक जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेतील शेकडो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सुरू असतानाच आता त्यांची बदली करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे त्यांची ही २४ वी बदली असेल. २१ वर्षात त्यांची २४ वी बदली करण्यात आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांची असंघटीत कामगार आयुक्त पदावरुन दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. आता त्यांची आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदली
1. लोकेश चंद्र - अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., यांची मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. अश्विनी भिडे - मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. विकास चंद्र रस्तोगी - अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी), कृषी व एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. विनिता वैद्य सिंघल - प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. परिमल सिंह - प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई, यांची सचिव (कृषी), कृषी व एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. तुकाराम मुंढे - सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई, यांची सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. लहू माळी - व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लि., मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. माणिक गुरसळ - यांची सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. प्रेरणा देशभ्रतार - सह आयुक्त, राज्य कर विभाग, मुंबई, यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. पृथ्वीराज बी. पी. - अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांची आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, विरार या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.