मुंबई : देशभरात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. भाविक जड अंत:करणाने बाप्पाला निरोप देत असताना राज्यात हळहळ करणारी घटना समोर आली आहे. धुळे शहरालगत चितोड गावात गणपती मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला.
धुळे शहरालगत असलेल्या चितोड गावात गणपती मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चितोड गावातील एकलव्य गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना मिरवणुकीचा ट्रॅक्टर भाविकांच्या अंगावर गेला. ट्रॅक्टर चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर येत आहे. तीन लहान बालके ट्रॅक्टरखाली चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सहा जणं जखमी तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये गणेशाची मूर्ती ठेवून मिरवणूक निघाली होती. त्यावेळी अचानक ट्रॅक्टरवरुन ताबा सुटल्याने मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असणाऱ्या गर्दीत ट्रॅक्टर शिरला. त्यामुळे चाकाखाली आल्यामुळे परी बागुल (वय 13), शेरा सोनावणे (वय 6), लड्डू पावरा (वय 3) या बालकांचा गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला.