मुंबई : मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. मुंबईतील सर्व भागात लोकांच्या घराघरात गणपती विराजमान होत आहेत. या गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कुर्ल्यातून मोठी दुर्घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास मुंबईतील कुर्ला पूर्व भागात एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळील सवेरा या रहिवाशी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील घरांना ही आग लागली.
इमारतीला आग लागल्यानंतर मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या इमारतीला आग नेमकी कशी लागली, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
मुंबईतील कुर्ला पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळील सवेरा या रहिवाशी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर असलेल्या डकमध्ये ही आग लागली. आगीच्या घटनेनंतर उपस्थित मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारत रहिवाशांना खाली उतरवलं. आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटात इमारत रिकामी करण्यात आली. इमारतीच्या बाराव्या मजल्यावर डकला लागलेली आग ही सोळाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं.