गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले
गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले "हे" निर्देश; वाचा त्यांनी अधिकाऱ्यांना काय काय सूचना दिल्या
img
दैनिक भ्रमर
मुंबई : राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश देऊन गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केला. 

सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, उर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी यावेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यावेळी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी य़ोजना राबवावी. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराणे बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहन तैनात करावेत.
महापालिकांनी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्नीशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सर्वंत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मुर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्री. श्री. शिंदे यांनी केले. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रमुख तसेच विविध गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना हर घर तिरंगा मोहिम यशस्वी करण्याचे आवाहनही केले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, सार्वजनिक गणेशोत्सव एकत्रित, मुर्तीकारांचे प्रतिनीधी, पर्यावरणपूरक सजावट उत्सवी संस्थेचे शाम शेंडकर आदी उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group