आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट ; वाचा सविस्तर
आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट ; वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात स्पष्ट केले की, दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती नाही. हे आत्महत्येचे प्रकरण आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात महायुती सरकारने बनवलेल्या एसआयटीनेच या प्रकरणातील आरोप निराधार असून दिशाच्या मृत्यूत घातपात नसल्याचे प्रतिद्यापत्र हायकोर्टात सादर केले.

सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर एसआयटीमध्ये तपास अधिकारी असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. दिशाच्या मृत्यू प्रकरणात घातपात दिसत नाही. दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती. शिवाय वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत, असे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. 

महायुती सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने हायकोर्टासमोर खुलासा करत तपास सुरूच आहे असे सांगत आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटलंय. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेली याचिका योग्य नसून ती फेटाळण्यात यावी, अशी विनंतीही मुंबई पोलिसांनी हायकोर्टाकडे केली आहे.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनचा ९ जून २०२० रोजी मालाडमधील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या एसआयटी किंवा सीबीआयकडून करण्याची मागणी केली होती.

आता महाराष्ट्र सरकारने हायकोर्टात सांगितले की, दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारच्या संशयाला जागा नाही. तसेच, आदित्य ठाकरे देखील निर्दोष आहेत. 

दिशा सालियनच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीवर क्रूरपणे बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण राजकीयदृष्ट्या दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. आदित्य ठाकरे यांचाही बलात्कार आणि हत्येत सहभाग आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात यावा.
इतर बातम्या
Join Whatsapp Group