मुंबईतील माहीम पाठोपाठ वरळी मतदारसंघातील लढत देखील विधानसभा निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी लढत ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या सेनेनं या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांना मतदारसंघातच अडकवण्याची ही खेळी असल्याचं बोललं जात आहे.
आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. ते पुन्हा याच मतदारसंघातून रिंगणात असून उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी महायुतीकडून शोध सुरू होता. सुरुवातीला शायना एनसी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र हा मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाट्याला आल्यानं त्यांनी देवरा यांना इथून रिंगणात उतरवलं आहे.
मिलिंद देवरा यांनी स्वत: सूचक ट्वीट केलं आहे. ‘वरळी आणि वरळीवासीयांना न्याय देण्याची वेळ आली आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. वरळीच्या विकासासाठी आमचं व्हिजन लवकरच जाहीर करू. आता वरळी!,’ असं देवरा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय राज्यमंत्री असून सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. वर्षभरापूर्वी काँग्रेसला रामराम करत त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्यांना राज्यसभेची खासदारकीही देण्यात आली. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात दुसरा तगडा उमेदवार मिळत नसल्यानं त्यांना इथून संधी देण्यात आली आहे.