शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे हे पक्षवाढीसाठी कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत 'खळा' बैठकीचे आयोजन केले जात आहे. यादरम्यान दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. या घडामोडींदरम्यान आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारबाबत मोठा दावा केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी या 31 तारखेपर्यंत सरकार पडणार म्हणजे पडणारच असा दावा केला आहे. ते म्हणाले की सध्या सुनावणी सुरू आहे. अध्यक्ष मोहदयांकडे जे ट्रिब्यूनल म्हणून काम करत आहेत त्यांनी संविधानानुसार घटनाबाह्य सरकार पाडून एकतर निवडणूका जाहीर करणं किंवा यांना बाद करणं अपेक्षित आहे. तर आणि तरच राज्यात लोकशाही जीवंत राहील असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही महाविकास आघाडी म्हणून तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष म्हणून मुंबई, कोकण पदविधर निवडणूकीची तयारी करत आहोत. वातावरण पाहता लोकसभा आणि विधानसभेत महाविकास आघाडीचा विजय पक्का असल्याचे देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.