मंत्र्यांच्या परदेशवारीवरून आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले मी उद्योगमंत्री म्हणून स्वतःच्या खर्चाने लंडनला गेलो आणि 13 मिटिंग घेतल्या, पण आमच्यावर जे आरोप करतात त्यांच्या परदेश दौऱ्याचा खर्च किती झाला हे कधी जाहीर करणार. यावेळी उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांच्या दाओस दौऱ्याचा संपूर्ण खर्चच मांडला.
या खर्चाची मांडणी करताना सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. त्यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे हे दाओस दौऱ्यावर असताना त्यांच्या चहापान आणि भोजनावर 1 कोटी 5 लाख 50 हजार 692 रुपये खर्च झाला. त्यांच्या निवासासाठी 2 कोटी 40 लाख 15 हजार रुपये खर्च आला असून विमान खर्चासाठी 44 लाख 63 हजार तर वाहन व्यवस्थेसाठी 67 लाख 19 हजार रुपये खर्च आल्याचे उदय सामंत यांनी सांगितलं.
उदय सामंत म्हणाले की, "लंडनमध्ये म्युझियममध्ये असलेली वाघनख भारतात आणण्यासाठी करार झाला. मी मागे देखील लंडन दौऱ्यावर असताना अनेकांनी राजकारण केले. मुख्यमंत्री यांचा दौरा 26 तारखेला ट्विट केल्यानंतर रद्द झाला असे काहींनी म्हटले. 25 तारखेला भूषण गगराणी यांनी कळवल होते, यांचे ट्विट 26 तारखेला झाले. काही लोकांना माहीत नव्हते मी लंडनला जात होतो तर कुणाच्या खर्चाने जात होतो. मी उद्योगमंत्री म्हणून स्वतःच्या खर्चाने गेलो आणि 13 मिटिंग घेतल्या."
उदय सामंत पुढे म्हणाले की, "आदित्य ठाकरे यांचा 2022 चा दौरा होता तेव्हा त्यांचा, नितीन राऊत आणि ओएसडी यांचा खर्च कुणी केला यांचं उत्तर त्यांनी दिले नाही. त्याचे पेपर माझ्याकडे आहे. स्वतः सरकारी पैशातून जायचं आणि दुसऱ्याच्या दौऱ्यावर बोलायचे हे कितपत योग्य आहे. तेव्हा उद्योग विभागाच्या दौऱ्यावर ऊर्जा मंत्री, पर्यटन मंत्री का गेले होते? आपण काय केलं हे लोकांना सांगायचे नाही आणि उगाच इतरांच्या नावाने खडे फोडायचे"