शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाणार आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिचा ८ जून २०२० ला मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार दिशाने आत्महत्या केली होती. पण, तिची हत्या झाली असा संशय व्यक्त करत आरोप करण्यात आला होता. दिशाच्या मृत्युनंतर जवळपास ६ दिवसांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता.
या प्रकरणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी देखील केली जात होती.
३ नोव्हेंबर २०२२ रोजी सीबीआयचा एक रिपोर्ट आला ज्यामध्ये झालेले राजकीय आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते. तसेच दिशाचा मृत्यू नशेच्याधुंदित १४व्या मजल्यावरुन पडून झाला होता.
दरम्यान दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणी सातत्याने काही आमदार करत होते, त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते.
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्या वेळी होते कुठे ? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी राज्य सरकार आता आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करणार आहे.