उन्हाळी सुट्टीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने सुट्टीचा हंगाम लक्षात घेता १० टक्के प्रवासी तिकीट दरवाढ केली आहे. येत्या 15 एप्रिलपासून एसटीचे नवे दर लागू होणार आहेत.
राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उन्हाळी गर्दीच्या हंगामात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘परिवर्तनशील भाडे’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामात १० टक्के प्रवासी तिकीट दरवाढ केली आहे. ही भाडेवाढ १५ एप्रिल २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, या कालावधीत साध्या बससाठी प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या काळात बसवर अतिरिक्त ताण येतो. या पार्श्वभूमीवर महसूल वाढवणे आणि सेवा सुरळीत ठेवणे यासाठी परिवर्तनशील भाडे लागू केले आहे. या योजनेअंतर्गत, बसची मागणी आणि मार्गानुसार भाड्यात वाढ केली जाणार आहे. या भाडेवाढीतून मासिक, त्रैमासिक व विद्यार्थी पासधारकांना वगळण्यात आले आहे. तसेच, काही विशेष योजना व सवलती यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, महागाईमुळे सर्वसामन्य लोक आधीच हैराण आहेत, त्यात आता राज्य परिवहन महामंडळाने देखील प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानं ग्राहकांच्या खिशावर याचा भार पडणार आहे.