नीट पेपरफुटी प्रकरणावरून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीमाना दिला आहे. दरम्यान आता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या मुद्दयावरुन पुढचा नंबर नितीन गडकरी यांचा असल्याचा दावा अनेक सोशल मिडिया अकाऊंटवरुन केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या मुद्दयावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मिडीयावरुन प्रचंड ट्रोल केले जात आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जात असल्याने वाहने बिघडतात, असा आरोप अनेकांनी केला आहे. यावरुन प्रचंड संतापही व्यक्त केला जात आहे. नितीन गडकरी यांच्याकडून त्यांच्या मुलाच्या इथेनॉल कारखान्यासाठी इंधनात इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयाचे समर्थन केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या सगळ्यामुळे नितीन गडकरी यांना सोशल मीडियावरुन प्रचंड ट्रोल केले जात आहे.
पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या मुद्द्यावरुन डीपफेक आणि एआय व्हिडीओंच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर पसरवला जात आहे. याविरोधात नितीन गडकरी हे मेटा, गुगल आणि एक्स यांच्याविरोधात दिवाणी खटला दाखल करु शकतात, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत, इथेनॉल धोरण आणि E 20 बाबत नितीन गडकरी यांच्याविरोधात पसवरण्यात येणारी चुकीची माहिती सोशल मिडीयावरुन काढण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या निर्णय हा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. यामध्ये नितीन गडकरी यांचा कुठलाही हस्तक्षेप नाही. त्यामुळे E 20 इंधनावरुन नितीन गडकरी यांच्याविरोधात पसरवण्यात आलेल्या पोस्ट काढून टाकण्यात याव्यात, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने नितीन गडकरी यांना कोर्टात दिवाणी खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर सोशल मीडियावर आणखी एका नव्या पार्टीची एन्ट्री झाली आहे. E20 जनता पार्टी असं या पार्टीचे नाव आहे. E20 जनता पार्टीची सर्वात मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध पेट्रोलही उपलब्ध करून द्यावे.