मुंबई: सोमवारी म्हणजेच २७ एप्रिलला भारतीय शेअर बाजारात सलग तीन सत्रांच्या घसरणीनंतर जोरदार उसळी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातून मिळालेले सकारात्मक संकेत आणि दिग्गज औषध निर्माण कंपनी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झालेली तुफान वाढ यामुळे देशांतर्गत बाजाराला मोठा आधार मिळाला. या चौफेर खरेदीमुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
आजच्या सत्रात सन फार्माच्या शेअर्सने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि कंपनीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक वाढला. कंपनीने अमेरिकास्थित 'ऑर्गॅनॉन अँड कंपनी'चे ११.७५ अब्ज डॉलर्सच्या (सुमारे ९७,५०० कोटी रुपये) महाकाय व्यवहारात पूर्ण अधिग्रहण करण्याची अधिकृत घोषणा केली.
भारतीय फार्मा क्षेत्रातील ही आजवरची सर्वात मोठी परदेशी खरेदी मानली जात आहे. या मोठ्या घडामोडीमुळे सन फार्माच्या बाजारमूल्यात तब्बल २७,४६२.५९ कोटी रुपयांची भर पडली असून ते ४,१६,१४२.८५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील (NSE) बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या निशाणावर म्हणजेच नफ्यात धावत होते. मात्र, यादरम्यान निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक काहीसा मागे राहिल्याचे दिसून आले. दुसरीकडे,
आघाडीच्या शेअर्सप्रमाणेच लघु आणि मध्यम भांडवली निर्देशांकांमध्येही (Small and Midcap) आज दर्जेदार खरेदी दिसून आली. निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक सुमारे १.६ टक्क्यांनी तर निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक १.२ टक्क्यांनी वधारला.
यापूर्वी सलग तीन सत्रांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रत्येकी सुमारे २.७ टक्क्यांची मोठी घसरण पाहायला मिळाली होती. इराण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भडकलेले दर आणि इन्फोसिस व एचसीएल टेक सारख्या दिग्गज आयटी कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमकुवत आलेले तिमाही निकाल यामुळे बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला होता. मात्र आजच्या या दमदार कमबॅकमुळे बाजाराने पुन्हा एकदा आपली गती पकडली आहे.