मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉक्रोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी आज पुन्हा एकदा सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे या तिघांना जंतर मंतर येथून ताब्यात घेतले. बंदी असूनही रांका, दास आणि शिंदे हे तिघेही जंतर-मंतर येथे आले त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. या तिघांना पोलिसांनी कुठे नेले आहे, हे अद्याप कळलेले नाही.
या नेत्यांनी जंतरमंतरवर आंदोलनाची परवानगी मागितली होती, परंतु ती नाकारण्यात आली होती. मात्र, आपली भूमिका स्पष्ट करत आंदोलनावर ठाम राहिलेल्या CJP कार्यकर्त्यांनी जंतरमंतरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह १२ ते १५ कार्यकर्ते पोलिसांना चकवा देत जंतरमंतरच्या परिसरात पोहोचले. त्यांनी तिथे तिरंगा झेंडा फडकवून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. या घटनेनंतर दिल्ली पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्स आणि सीआरपीएफचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवून अज्ञात स्थळी नेले. या कारवाईनंतरही आशुतोष रांका यांनी ट्विट करत, “मोदीजी, तुम्ही म्हणाला होता की आम्ही जंतरमंतरपर्यंत पोहोचणार नाही, पण कॉक्रोचेस तिथे पोहोचले आहेत,” असे म्हटले आहे.