सध्या देशात आंदोलनावरून गदारोळ निर्माण झाला असून असून कॉक्रोचे जनता पार्टीच्या =दोन प्रमुख नेत्यांना न्यायालयाने ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी आणि पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून बंदी असलेल्या क्षेत्रात प्रवेश केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीच्या दोन प्रमुख नेत्यांना न्यायालयाने ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरव दास आणि सह-संयोजक आशुतोष रांका यांना विशेष कार्यपालक दंडाधिकाऱ्यांनी तिहार तुरुंगात पाठवले आहे. तर याच प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले तिसरे नेते अजिंक्य शिंदे यांना शांतता राखण्याचा बाँड भरून घेतल्यानंतर सोडण्यात आले आहे.
मतदार यादीतील विशेष सखोल पुनरीक्षणमधील कथित गैरव्यवहारांच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी या नेत्यांनी जंतरमंतरवर तिरंगा फडकवत निदर्शने केली होती.
तिहार तुरुंगात का धाडले? पोलिसांचा युक्तिवाद दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना गेल्या शनिवारीही आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी एक वर्षासाठी शांतता राखण्याचा आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचा बाँड भरला होता. हा बाँड भरलेला असतानाही मंगळवारी पहाटे दोन्ही नेत्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ चे पुन्हा उल्लंघन केले आणि पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. शांतता राखण्याच्या हमीपत्राच्या अटींचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही ५ दिवसांसाठी थेट तिहार तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले.