CJP मध्ये नाराजीचा सूर; अभिजीत दीपकेंच्या घराबाहेर समर्थकाचं आंदोलन
CJP मध्ये नाराजीचा सूर; अभिजीत दीपकेंच्या घराबाहेर समर्थकाचं आंदोलन
img
Nandini khandare More

सीजेपीमध्येच असलेल्या मतभेदांच्या चर्चांदरम्यान अभिजीत दीपके यांच्या घरासमोर एका समर्थकाने आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आंदोलनामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि नेतृत्वाबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाची बैठक आयोजित केली. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत संघटन विस्तार, आगामी रणनीती आणि पक्षाच्या पुढील भूमिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जवळपास सात तास चाललेल्या या बैठकीकडे माध्यमांसह देशभरातील समर्थकांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, बैठकीसाठी निमंत्रण न मिळाल्याचा आरोप करत गुजरातमधील एका तरुणाने अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. आंदोलनकर्त्याने पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत, “देशपातळीवर संघटना उभी करायची असेल तर केवळ काही मोजक्या लोकांनी निर्णय घेऊन चालणार नाही. CJP ही कौटुंबिक चळवळ नसून देशव्यापी आंदोलन आहे. मग बैठकीत निवडक लोकांनाच का सहभागी करून घेतले जाते?” असा सवाल उपस्थित केला.

बैठकीदरम्यान पक्षाच्या भविष्यातील विस्तारावर व्यापक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयांचा रोडमॅप अभिजीत दीपके आज जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात कॉकरोच जनता पार्टीचा देशभर विस्तार करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

यावेळी पत्रकारांनी अभिजीत दीपके यांना CJP चे रूपांतर राजकीय पक्षात करण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी, “सध्या तरी असा कोणताही निर्णय नाही. देशात आधीच अनेक राजकीय पक्ष आहेत. आणखी एका पक्षाची गरज नाही,” असे स्पष्ट केले.

अभिजीत दीपके यांनी पुढे सांगितले की, सध्या कॉकरोच जनता पार्टी ही राजकीय पक्ष म्हणून नव्हे, तर दबावगट (Pressure Group) म्हणून कार्यरत राहणार आहे. जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि शासनावर लोकहिताच्या मुद्द्यांसाठी दबाव निर्माण करणे, हीच पक्षाची सध्याची रणनीती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, Gen-Z तरुणांचा या संघटनेला मोठा पाठिंबा मिळत असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group