नाशिक : केंद्र आणि राज्य सरकारने व्यापाऱ्यांचा सुरू असलेल्या संपात हस्तक्षेप करावा आणि बाजार समिती सुरू कराव्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओतून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सध्या नाशिक मध्ये सुरू असलेल्या कांदा व्यापारी संपाच्या बाबत बघ्याच्या भूमिकेवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या व्हिडिओमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले आहे की केंद्र आणि राज्य सरकारने कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये एक प्रकारचे भांडण लावले आहे. या भांडणातील मजा दोन्ही सरकार घेत आहे. आठ दिवस होत आले आहे पण व्यापाऱ्यांचा संप मिटण्याच नाव घेत नाही याबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकार कोणतीही भूमिका घेण्यास तयार नाही.
त्यामुळे हा संघर्ष अधिकच वाढू लागला आहे. आता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांचा हा संप तातडीने मिटवावा आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.