कांदा व्यापारी आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची बैठकही निष्फळ
कांदा व्यापारी आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची बैठकही निष्फळ
img
दैनिक भ्रमर

नाशिक - कांदा व्यापारी आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यात झालेली बैठक ही निष्फळ ठरली असून केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क मागे घेण्यास नकार दिल्यामुळे आता याबाबतची पुढील भूमिका ठरविण्याचा निर्णय हा नाशिकमध्ये होणार आहे. व्यापाऱ्यांनी आपला बंद हा कायम ठेवला आहे.

केंद्र शासनाने कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागू केले त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कांद्याची बाजारपेठ असणाऱ्या सर्व 17 बाजार समिती यांनी कांद्याचे लिलाव हे आठ दिवस म्हणजे 13 सप्टेंबर पासून 20 सप्टेंबर पर्यंत चालू ठेवले परंतु व्यापार करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होता बंद आंदोलन सुरू केले.

आज यावर चर्चा करण्यासाठी म्हणून राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी सर्व माहिती दिल्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांना भेटण्यासाठी आणि तेच निर्णय घेऊ शकतात यासाठी म्हणून दिल्लीला जाण्याचा निर्णय झाला.

दुपारनंतर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे निवडक प्रतिनिधी हे दिल्लीला गेले. रात्री नऊ वाजता ही बैठक संपल्यानंतर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी हे समाधानी नसल्याचे समोर आले. व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे ही बैठक निष्फळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता नाशिक मधील दिल्लीला गेलेले कांद्याचे व्यापारी हे उद्या नाशिकला आल्यानंतर नाशिक मधील त्यांच्या अन्याय सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील भूमिका ठरविणार असल्याची माहिती अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group