नाफेड पेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी खुल्या बाजारात
नाफेड पेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी खुल्या बाजारात
img
Dipali Ghadwaje

नाशिक -  जिल्ह्यात सातत्याने बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव दुसऱ्या दिवशी देखील चढेच राहिले दुसऱ्या दिवशी या भावामध्ये पिंपळगाव 700 रुपये तर लासलगाव मध्ये सुमारे तीनशे रुपये भाव वाढ झाली. या खुल्या बाजारातील भाववाढीमुळे केंद्र सरकारचे नाफेड या यंत्रणेच्या कांदा खरेदीला आता फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खुल्या बाजारातील कांद्याचे भाव हे मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.

मागील पंधरा दिवसापासून सातत्याने कांद्याच्या भाव वाढीबाबत वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कामध्ये 40 टक्के वाढ केली होती. त्यानंतर या वाढीला विरोध करण्यासाठी व्यापारी, शेतकरी आणि बाजार समिती संचालक यांनी तीव्र विरोध केला होता.

यानंतर येथील व्यवहार ठप्प झाले होते. त्यावर मध्यस्थी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तीन दिवसांच्या बंद नंतर व्यापारी असोसिएशनने बंद मागे घेतला. परंतु चौथ्या दिवशी मात्र भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखले होते.

या सगळ्या नाट्यपूर्ण घडामोडी घडत असताना कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी सातत्याने बाजार समितीमध्ये व्यापारी ज्यावेळेस लिलावासाठी आले त्यावेळेस म्हणजेच मागील दोन दिवसापासून सातत्याने खुल्या बाजारातील कांद्याचे भाव हे वाढू लागले आहेत. लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील कांद्याचे भाव हे चढते राहिल्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला भाव मिळू लागला आहे.

नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या बाजारपेठेमध्ये प्रमुख असलेल्या आशिया खंडातील लासलगाव येथील बाजार समितीमध्ये कांद्याला दुसऱ्या दिवशी देखील सत्तावीस रुपये इतका भाव मिळाला तर शेजारी असलेल्या पिंपळगाव बसवंत या बाजार समितीच्या आवारात आज यावेळी शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणला. त्यावेळी म्हणजे सकाळपासूनच चढते भाव होते. या ठिकाणी शेतकऱ्यांना 3100 बाजारभाव मिळाला आहे म्हणजे नाफेड या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जो 2410 रुपये या दराने खरेदी केली जात आहे. त्यापेक्षा हा बाजारभाव जास्त आहे. लासलगाव येथे तीनशे रुपये तर पिंपळगाव येथे शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये जास्त दर मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता किरकोळ बाजारातील दर वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे

दरम्यान, केंद्र सरकारची यंत्रणा असलेली नाफेड या माध्यमातून 2410 रुपये या भावाने कांदा खरेदी केला जात आहे. त्यापेक्षा खुल्या बाजारामध्ये जास्त भाव मिळत असल्याने आता नाफेडची खरेदी ही कोंडीत सापडली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group