नाशिक - कांदा व्यापारी संघटनेच्या बैठकीमध्ये बंद बाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचा बंद हा कायम राहणार आहे.
कांदा व्यापाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून कांदा लिलावामध्ये सहभागी न होता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा व्यापारी यांना केंद्र सरकारने सुरू केलेली 40 टक्के निर्यात शुल्क कमी करणे यासह स्थानिक बाजार समितीमध्ये सुरू असलेले कर कमी करावे आदींसह सह वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन त्यांनी यापूर्वीच राज्य सरकारला पाठविले आहे तसेच जिल्हा प्रशासनाला देखील दिले आहे.
त्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेले दादा भुसे यांच्या समवेत झालेल्या बैठकीवर विचार विनिमय करण्यासाठी आज दुपारी येवला येथील कलंत्री लॉन्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व कांदा व्यापारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व घडामोडींविषयी चर्चा करण्यात आली.
तसेच आत्ता व्यापाऱ्यांना कांदा लिलावात सहभागी होणे हे परवडत नसल्यामुळे व्यापारी कांदा लिलावात सहभागी झालेले नाही अशी भूमिका कांदा व्यापारी संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समिती सुरू असल्या तरीही व्यापारी सहभागी होणार नाही, असे सांगण्यात आले. या बैठकीमध्ये सुरू असलेले आंदोलन हे कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आज झालेल्या कांदा व्यापारी संघटनेच्या बैठकीमध्ये हा बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.