नाशिक :- अशा पद्धतीने कांदे टोमॅटो रस्त्यावर फेकून प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांनी सबुरीने भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर असताना कळवण येथे शेतकरी कृतज्ञता मेळाव्यात बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले, कांदा निर्यात शुल्कावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. हे निर्यात शुल्क काढून टाकले पाहिजे अशी सर्वांची भावना आहे. एखाद्या पिकाला चांगला भाव मिळाला की सर्व शेतकरी त्याच पिकाची लागवड करतात. परिणामी पिकाचा पुरवठा वाढला की भाव घसरतात. शेतमाल रस्त्यावर फेकल्याने घसरलेले भाव वाढणार नाहीत. सरकार तुमच्यासोबत आहे, शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले.
सध्या टोमॅटोचे भाव कोसळले आहेत, दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला सर्वाधिक भाव होता. मध्यंतरी कांद्याचा प्रश्न मोठा बिकट झाला होता. व्यापाऱ्यांनी कांदा घेणे बंद केले होते. पाऊस कसा आहे, यावर भाव अवलंबून असतात. धरणात किती पाणी आहे? नैसर्गिक संकट काही आले का? असे प्रश्न समोर येत असतात. त्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. या सगळ्यांवर भाव अवलंबून असतात. त्यामुळे अशा पद्धतीने कांदे टोमॅटो रस्त्यावर फेकून प्रश्न सुटणार नाही.
त्याच्यात दुसरा काही मार्ग काढता येईल का? यावर चर्चा केली पाहिजे. जे जे राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतील, तेथे निर्णय आम्ही सर्व मिळून घेऊ आणि जिथं केंद्राची गरज भासेल तिथे त्यांच्याकडे देखील पाठपुरावा करू, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी दिला.
गणेशोत्सव जसा निर्विघ्नपणे पार पडला तसेच नवरात्र दसरा चांगल्या पद्धतीने पार पडावा व माझ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळावा असे मागणे सप्तशृंगी देवी कडे केल्याचे अजित पवार म्हणाले.