मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बुधवारी आणखी एका सहकारी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयनं त्या बँकेचा बँकिंग परवाना रद्द करत असल्याची घोषणा केली.
बँकेकडे योग्य प्रमाणात रोख रक्कम नसून नफा मिळवण्याची शक्यता नाही, या निष्कर्षामुळं आरबीआयनं अहमदाबाद येथील कलर मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई केली आहे.
आरबीआयनं कलर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. बँकेचं सुरु राहणं भविष्यात ठेवीदारांसाठी धोकादायक ठरु शकतं.
सध्याच्या आर्थिक स्थितीत बँक सध्याच्या ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे परत करण्यात असक्षम आहे. यामुळं बँकेचे ग्राहक त्यांच्या पैशाचं काय होणार या विचारानं त्रस्त आहेत.
ग्राहकांच्या पैशाचं काय होणार?
रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार गुजरातमधील सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारला बँक बंद करणे आणि प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भातील आदेश जारी करण्याची सूचना देण्यात आली आहे. आता डीआयसीजीसीच्या नियमानुसार ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवरील विमाच्या रक्कम मिळवण्यासंदर्भात दावा करता येईल.
सहकारी बँकेनं दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास 98.51 टक्के ठेवीदार डीआयसीजीसीकडून त्यांची पूर्ण रक्कम मिळवू शकतात. 31 मार्च 2024 पर्यंत डीआयसीजीसीनं बँकेशी संबंधित ठेवीदारांच्या इच्छेनुसार विम्यासाठीच्या जमा रकमेतून 13.94 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.
आरबीआयनं कलर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्याचं कारण बँकेंकडून पुरेशी रोकड उपल्बध नसणे याशिवाय बँक नफा कमावण्याची शक्यता नाही. सहकारी बँक बँकिंग अधिनियमातील काही अटींचं पालन करण्यात बँक अयशस्वी ठरली.
आरबीआयनं बँकेला यापुढं बँकिंग कामकाज सुरु ठेवण्याची परवानगी दिल्यास जनहितावर विपरीत परिणाम झाला असता. त्यामुळं कलर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळं बँकेचा कारभार आजपासून बंद असेल.