आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. दरम्यान आयपीएल 2026 च्या स्पर्धेत एक दुर्मिळ अन ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे. पहिल्यांदाच सर्व दहा संघांचं नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे असणार आहे.
यापूर्वीच्या आयपीएल इतिहासात पाहिल्यास आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये निदान एक तरी विदेशी कर्णधार होता. मात्र या पर्वात सर्व दहा कर्णधार भारतीय आहेत. मागच्या 18 हंगामांमध्ये शेन वॉर्नपासून ते ॲडम गिलक्रिस्ट, डेव्हिड वॉर्नर, फॅफ डु प्लेसिस आणि पॅट कमिन्सपर्यंत अनेक विदेशी खेळाडूंनी संघांचे नेतृत्व केले आहे. पण यावेळी सर्व 10 संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडू करत आहेत.
पॅट कमिन्स दुखापतग्रस्त असल्याने सनरायझर्स हैदराबादने संघाचं नेतृत्व इशान किशनकडे सोपवलं आहे. त्यामुळे हा विक्रम नोंदवला गेला आहे. पॅट कमिन्स मधल्या टप्प्यात परतेल की नाही हे सांगता येत नाही. जर परतला नाही तर या संपूर्ण हंगामात भारतीय कर्णधार म्हणून नोंद होईल.
इशान किशन पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत कर्णधाराची भूमिका बजावणार आहे.इशान किशनने झारखंडला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिल्याचा अनुभव असल्यामुळे सनरायझर्स बोर्डाने त्याच्यावर विश्वास ठेवला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड, मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या, राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान पराग, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेलकडे आहे तर गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुबमन गिल करत आहेत.
लखनौ सुपरजायंट्सची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरची जबाबदारी रजत पाटीदारकडे आहे. केकेआरला विजेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यर मागच्या पर्वापासून पंजाब किंग्सचा कर्णधार आहे. तर केकेआर संघाची धुरा अनुभवी अजिंक्य रहाणे करत आहे.