जात जात नाही ती जात... छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकारी सतत छळ करतात, जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक त्रास देतात,अशी हृदयद्रावक सुसाईड नोट लिहून एसटी महामंडळाच्या एका सहाय्यक वाहतूक निरीक्षकाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी आगारप्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद विठ्ठल भिवसने वय ४०, रा. वैशाली नगर, सिल्लोड असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर डेपो मॅनेजर विजय काळवणे, वाहतूक निरीक्षक किरण अवसरमल, लिपिक विकास चव्हाण असे संशयित आरोपीचे नाव आहे. माहितीनुसार, शरद भिवसने हे सिल्लोड आगारात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते हृदयविकारामुळे वैद्यकीय रजेवर होते.
शरद यांचे भाऊ पोपट भिवसने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शरद भिवसने हे बुधवारी सकाळी सिल्लोड आगारात हजर होण्यासाठी गेले होते. यावेळी आगारप्रमुख विजय काळवणे तसेच सहायक वाहतूक अधिकारी किरण अवसरमल आणि विकास चव्हाण यांनी त्यांच्या वेशभूषेवरून व वैयक्तिक स्वरूपावरून अपमानास्पद टिप्पणी केली.
तसेच जातीवाचक शब्द वापरून त्यांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठांकडून झालेला अपमान व मानसिक तणाव सहन न झाल्याने शरद भिवसने यांनी दुपारी भराडी रस्त्यावरील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात आगारप्रमुख व दोन सहायक अधिकाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.