राज्यातील घडामोडींना वेग आला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दडी मारल्याने अक्षरशः दुष्काळसदृश परिस्तिथी निर्माण झाली आहे. आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यात प्रचंड मोठा दुष्काळ पडला आहे.1972ला झाला होता तसा दुष्काळ झाला आहे. खूप मोठं नुकसान झालं आहे. पण तुम्ही चिंता करू नका. सरकार तुमच्या पाठिशी आहे. येत्या दोन दिवसात आम्ही दुष्काळाचा जीआर काढणार आहोत. दुष्काळासाठीची सर्व मदत करणार आहोत. रब्बी पिकं घेता आली तर त्यासाठीही मदत करणार आहोत, असं सांगतानाच तुमचं सरसकट नुकसान झाल्याने आम्ही तुम्हाला सरसकट मदत करणार आहोत, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूरच्या दौऱ्यावर आहेत. औसा आणि निलंग्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना येत्या दोन दिवसात दुष्काळाचा जीआर काढणार असल्याची घोषणा केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जलसंधारणाची कामे हाती घेणार आहोत. रोजगार निर्मितीचीही कामे हाती घेणार आहोत. या संकटात तुम्ही एकटे नाही. आम्ही सर्व शक्तीने तुमच्यासोबत आहोत. आपण कर्ज माफी केली. 48 हजार कोटींचं जुन लाईट बील माफ केलं. हे बील कधीच वसूल करण्यात येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
संकटात एकमेकांना मदत करू
थोडा धीर ठेवा. लवकर मदत करू तुम्हाला लवकर मदत नाही मिळाली तर अडचण वाढेल हे आम्हालाही कळतं. आम्ही पंचनामे करत आहोत. पंचनामे कायदा म्हणून करावे लागत आहेत. कायद्याची तरतूद आहे म्हणून पंचनामे करत आहोत. आम्ही थांबत नाही. तुमचं नुकसान सरसकट झालेलं आहे. त्यामुळे सरसकट मदत करणार आहोत. तीन चार महिने आपल्यासाठी आव्हानाचे आहेत. या संकटात एकमेकांना मदत करून पुढे जाऊ, असं फडणवीस म्हणाले.
कर्जमाफीचं काम अजूनही सुरू आहे. जोपर्यंत कर्जमाफीचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. कर्जमाफीचे पैसे देऊ. दुष्काळाचे पैसे लवकरात लवकर खात्यात टाकू. 1972 नंतर इतका मोठा दुष्काळ पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. मागच्या काळात 64 टक्के पाऊस झाला होता. आता 50 टक्के पाऊस झाला आहे. पण चिंता करू नका. सरकार तुमच्यासोबत आहे. जे चांगलं आहे ते करू. तुम्हाल मदत करणयात मागे पुढे पाहणार नाही. धीर ठेवा, असं आवाहनही त्यांनी केलं.
मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पण सर्वाधिक परिणाम लातूरवर झाला आहे. त्यातून आपण मार्ग काढणार आहोत. चारा आणि पाण्याचं नियोजन केलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीतून पाणी आणलं जाणार आहे. जी काही मदत लागेल ती आम्ही करणार आहोत. तुम्हाला आर्थिक मदत दिली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.