अभिनेत्री कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच चर्चेचा विसाह्य ठरलेला आहे. हा चित्रपट भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आडहरित आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. यावेळी त्यांनी कंगनाचं कौतुक करत आणीबाणीवर भाष्य केलं आहे. याच दरम्यान त्यांनी भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
इंदिरा गांधी माझ्यासाठी सर्वात मोठ्या व्हिलन होत्या, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. इमर्जन्सी चित्रपट आणि या चित्रपटाच्या टीमचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आणीबाणी आपल्या सर्वांसाठी असा काळ होता, जेव्हा देशातील सगळ्या नागरिकांचे मानवाधिकार समाप्त करण्यात आले होते. हा काळ माझ्यासाठी वैयक्तिकरित्या महत्वाचा आहे. कारण आणीबाणीच्या काळात माझे वडील जवळपास दोन वर्षे तुरुंगात होते. तेव्हा मी केवळ पाच वर्षांचा होतो. त्यावेळी मला वडिलांना भेटायचं असेल तर न्यायालय किंवा तुरुंगात जावं लागायचं. आजही त्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत.”
“आता तो आणीबाणीचा काळ पुन्हा एकदा कंगनाने चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर आणला आहे. कंगना स्वत: या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ती प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय देते. ती एक उत्कृष्ण अभिनेत्री आहे. इंदिरा गांधी देशाच्या खूप मोठ्या नेत्या होत्या. पण त्या काळात त्या आमच्यासाठी खूप मोठ्या व्हिलन होत्या. पण ठीक आहे. प्रत्येक कालखंडाची एक वेगळी कहाणी असते. इंदिरा गांधी यांनीही आपल्या देशासाठी चांगलं काम केलं आहे”, असंही फडणवीस म्हणाले.
“मला वाटतं की, आणीबाणी आपल्या देशासाठी वाईट जखम होती. त्यामुळे ती देशातील लोकांपर्यंत पोहोचवणं पण तितकंच गरजेचं आहे. जर आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकशाहीवर आलेल्या संकटाबाबत आपल्या येणाऱ्या पिढीला सांगावं लागेल. कारण तोपर्यंत त्यांना लोकशाहीची किंमत कळणार नाही,” असंही फडणवीस म्हणाले.