"मी पुन्हा येईल म्हटल्यावर मी येतोच, हे तुम्हाला चांगले माहित आहे,":- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
img
Chandrakant Barve

 नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): "मी पुन्हा येईल म्हटल्यावर मी येतोच, हे तुम्हाला चांगले माहित आहे," अशा खुमासदार शैलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताच सभागृहात एकच हशा उसळला.

नाशिकरोड येथील "मित्रा" संस्थेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्देशून थेट संवाद साधत त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली."आमची लायकी घडविण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही चांगले काम केले तर लोक म्हणतील मुख्यमंत्री चांगला आहे. पण तुम्ही वाईट काम केले, तर लोक म्हणतील मुख्यमंत्री नालायक आहे. त्यामुळे तुमचे कार्य खूपच महत्त्वाचे आहे," असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "वर्षभराने मी पुन्हा येईल आणि आढावा घेईल. मी पुन्हा येतो म्हटले की येतोच, हे तुम्हाला माहिती आहे." त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात हास्याचा माहोल निर्माण झाला.

या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल ढिकले, तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये निधी वितरण प्रक्रियेतील पारदर्शकता, गतिमान कार्यपद्धती आणि लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस आयुक्त डॉ संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत व साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group