कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. साताऱ्यात झालेल्या प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण लाभार्थी मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, कांदा शेतकऱ्यांच्या दुरवस्थेबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे कांदा खरेदी करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर आता १२ रुपये ३५ पैशांनी कांद्याची खरेदी सुरू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री आणि साताऱ्याचे पालक मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्रालयाबाहेर कांद्याच्या दरावरून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयासमोर कांदा फेकून रोष व्यक्त केला होता.
केंद्र आणि राज्य सरकार मिळून ऊस कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरील संकट पूर्णपणे दूर करेल, असा शब्द या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. यासोबतच, ज्या शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज प्रामाणिकपणे आणि वेळेवर भरले आहे, त्यांना सरकारकडून प्रोत्साहन राशी देऊन सन्मानित केले जाणार आहे.