सातारा : साताऱ्या जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत तब्बल एकच बँक खाते नंबर देऊन ३० अर्ज भरले होते. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी आतापर्यंत दोन व्यक्तींना अटक केलेली आहे. अटक केलेले व्यक्ती पती- पत्नी असून या गुन्ह्याबाबत पोलीस आता त्यांची चौकशी करत आहेत. वडुज पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. दर महिन्याला १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. दरम्यान जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे ३ हजार रुपये अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी वडूज येथील एका व्यक्तीने ३० अर्ज भरून एकच बँक खाते क्रमांक देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सदर व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी लाडकी बहीण योजनेमध्ये ३० फॉर्म भरले असून या सर्व फॉर्मला एकच अकाउंट नंबर होता. तसेच आधार कार्ड वेगवेगळे वापरले होते. त्याबाबत फोटोग्राफमध्ये सुद्धा त्यांनी बदल केलेला होता.
सदर प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने त्रिसदस्य समितीची स्थापन केली होती. त्या समितीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल प्रशासनाला दिला. त्याप्रमाणे शासनाकडून २ सप्टेंबरला फिर्याद दिली असून त्या फिर्यादीप्रमाणे पती- पत्नीला ताब्यात घेऊन कस्टडीत ठेवून चौकशी सुरू आहे.
तसेच त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास सुरू आहे.
पैशाच्या हव्यासापोटी हा गुन्हा त्या व्यक्तीने केलेला असल्याचे प्रथमदर्शनी समजून येत आहे. या गुन्ह्यात काही नातेवाईक आणि अनोळखी महिलांचे कागदपत्र वापरल्याचे दिसून येत आहे.