केवायसी साठी
केवायसी साठी "लाडक्या बहिणी" घोटी स्टेट बँकेच्या आवारात उघड्यावर मुक्कामी ; ५ दिवसांपासून काम होत नसल्याने मुक्कामाचा निर्णय
img
दैनिक भ्रमर
इगतपुरी  : लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वस्त केले होते. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते.

मात्र इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लाडक्या बहिणींना भर पावसाळ्यात बँकेच्या आवारात मुक्काम करण्याची अवघड वेळ आली आहे. बँकेच्या बचत खात्याला आधार लिंक आणि केवायसी करण्यासाठी ह्या बहिणींवर उघड्यावर मुक्कामी थांबण्याची अवघड परिस्थिती उदभवली आहे.

बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान आदिवासी वाड्यापाड्यावरील ह्या महिलांनी घोटी येथील स्टेट बँकेच्या आवारात मुक्काम ठोकला आहे. केवायसी व आधार लिंक फॉर्म भरण्यासाठी ह्या महिला येथे आल्या आहेत. बँकेत चार पाच दिवसांपासून रोज येऊनही प्रचंड गर्दीमुळे गावी परत जावे लागते. बँकेचा कारभार जास्तच ढिलाईचा असल्याने सकाळ पासून येऊनही काम होत नसल्याने महिलांनी बँकेच्या आवारातच रात्री मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.

लांब गाव पाड्यातून महिलांना या कामासाठी रोज येजा करून भाडे परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी बँक उघडल्यावर लवकर नंबर लागेल अन लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील या आशेने आलेल्या महिलांनी बँकेच्या आवारात मुक्काम ठोकल्याने बँकेचाही कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिकमध्ये उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी सूक्ष्म नियोजन सुरु असून कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांची बडदास्त ठेवली जाणार आहे. दुसरीकडे बँकेच्या आधार लिंक आणि केवायसीसाठी आदिवासी महिलांवर उघड्यावर मुक्कामी येण्याचा दुर्दैवी प्रसंग आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group