इगतपुरी : अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते आहे. अशातच इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव फाट्यावर मुंबई आग्रा महामार्गावर एका ट्रकने पायी चालणाऱ्या युवकाला धडक दिल्याने मोठा अपघात झाला. दरम्यान या अपघातात युवक जागीच ठार झाला.

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबई आग्रा महामार्गावर एका ट्रकने पायी चालणाऱ्या युवकाला धडक दिल्याने या युवकाचा अपघात झाला आहे. अविनाश कैलास गतीर असे या अपघात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. काल सायंकाळी झालेल्या या घटनेमुळे मुंढेगाव परिसरातील ग्रामस्थांच्या संतापाचा अतिरेक झाल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मुंढेगाव फाट्यापासून दोन्ही बाजूला दीड दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर ग्रामस्थांनी सुचवलेल्या उपाययोजना कराव्यात. तसेच मृताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई द्यावी. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे उड्डाण पूलाची प्रमुख मागणीसह अन्य मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.