आजकाल मालमत्ता वाटपावरून अनेक घरांमध्ये अगदी टोकाचे वाद आपल्याला पहायला मिळतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का वडिलांच्या निधनानंतर मुलं अन् आई यांच्यामध्ये मालमत्ता वाटणीत पहिला अधिकार कुणाचा असतो? तुम्हाला माहित आहे का काय आणि कसे आहेत नियम जाणून घ्या वडिलांच्या निधनानंतर मुलं अन् आई यांच्यातल्या कोणला मलमत्ता वाटणीचा पहिला अधिकार मिळतो.
कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये पहिला अधिकार कुणाचा? हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. मात्र, कायद्याच्या दृष्टीने याचे स्पष्ट उत्तर असून, कोणालाही पहिला हक्क दिलेला नाही.
कायदा काय सांगतो?
भारतातील हिंदू कुटुंबांसाठी लागू असलेल्या हिंदू उत्तराधिकार कायदा 1956नुसार, वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेवर “क्लास-1 वारस” यांचा हक्क असतो. यामध्ये पत्नी (आई), मुलगा आणि मुलगी यांचा समावेश होतो. त्यामुळे या तिघांनाही समान अधिकार दिलेले आहेत.
पहिला हक्क कुणाचा?
सामान्य समजुतीप्रमाणे आईला किंवा मोठ्या मुलाला पहिला हक्क असतो असे मानले जाते, मात्र हे चुकीचे आहे. कायद्यानुसार आई आणि सर्व मुलांना समान वाटा मिळतो. म्हणजेच, संपत्तीचे विभाजन सर्व वारसांमध्ये समान प्रमाणात केले जाते. उदाहरणार्थ, जर आई आणि दोन मुले असतील, तर संपत्तीचे तीन समान भाग केले जातात. प्रत्येकाला एक-एक हिस्सा मिळतो.
मुलगा आणि मुलगी समान
पूर्वी मुलाला प्राधान्य दिले जात असे, पण आता कायद्यात सुधारणा झाल्यानंतर मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हक्क आहे. त्यामुळे मुलीला देखील तितकाच हिस्सा मिळतो आणि तिला वंचित ठेवता येत नाही.
वसीयत असल्यास नियम बदलतात
जर वडिलांनी जिवंतपणी मृत्यूपत्र (Will) केलं असेल तर मालमत्तेचे वाटप त्यानुसार होते. अशा वेळी कायद्याने ठरवलेले समान वाटप लागू होत नाही. मात्र वसीयत वैध आणि कायदेशीर असणे आवश्यक आहे.
स्वतःची आणि पिढीजात मालमत्ता
वडिलांची मालमत्ता दोन प्रकारची असू शकते. स्वतः कमावलेली (Self-acquired) आणि पिढीजात (Ancestral). स्वतः कमावलेल्या मालमत्तेवर मृत्यूपत्र नसेल, तर ती समान वाटली जाते. पिढीजात मालमत्तेत मुलांना जन्मतःच हक्क असतो. वाद टाळण्यासाठी काय करावे? मालमत्तेच्या वाटणीवरून अनेकदा कुटुंबात वाद होतात. त्यामुळे सर्वांनी एकत्रित चर्चा करून, परस्पर संमतीने निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आवश्यक असल्यास कायदेशीर सल्ला घेऊन प्रक्रिया पूर्ण करावी.