युरिया आणि डीएपी खरेदी करताय? आधी 'ही' बातमी वाचा, अन्यथा होईल मोठी फसवणूक!
युरिया आणि डीएपी खरेदी करताय? आधी 'ही' बातमी वाचा, अन्यथा होईल मोठी फसवणूक!
img
नितीशा कुलकर्णी






बनावट खत म्हणजे केवळ पैशांचा अपव्यय नाही, तर संपूर्ण पिकाचे नुकसान! सध्या बनावट खतांच्या विक्रीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कृषी तज्ज्ञांनी आता युरिया आणि डीएपी सारखी महत्त्वाची खते शुद्ध आहेत की नाही, हे ओळखण्यासाठी काही साध्या पण प्रभावी टिप्स दिल्या आहेत. आपला घाम गाळून कमावलेला पैसा वाया जाऊ नये, यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने हे वाचलंच पाहिजे. सध्या बाजारात अनेक बनावट पदार्थ विक्रिस येत आहेत.

अशातच आता शेतकर्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बाजारात सध्या बनावट खतांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक तर होतेच, पण पिकांचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

बनावट खतांमुळे दुहेरी नुकसान

बनावट खतांचा वापर केल्यास पिकांची वाढ नीट होत नाही, उत्पादन घटते आणि शेतकऱ्यांचा खर्च वाया जातो. परिणामी शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसतो. एकीकडे पैशांचे नुकसान आणि दुसरीकडे उत्पादनात घट. त्यामुळे खरी आणि बनावट खत यामधील फरक ओळखणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

युरिया खत ओळखण्याचे सोपे मार्ग

युरिया हे सर्वाधिक वापरले जाणारे खत असल्याने त्यामध्ये बनावट माल मोठ्या प्रमाणात आढळतो. कृषी तज्ञांच्या मते, खरा युरिया ओळखण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. खरा युरिया पांढऱ्या रंगाचा, समान आकाराचे चमकदार आणि कडक दाण्यांचा असतो. तो पाण्यात पूर्णपणे विरघळतो आणि पाण्याला स्पर्श केल्यावर थंडावा जाणवतो. युरिया गरम केल्यास त्याचे दाणे सहज वितळतात. जर युरिया पाण्यात टाकल्यानंतर विरघळला नाही किंवा पाण्याला थंडावा जाणवला नाही, तर तो बनावट असण्याची शक्यता असते. तसेच तव्यावर किंवा कढईवर गरम केल्यावर दाणे वितळले नाहीत, तर तो युरिया बनावट असू शकतो.

डीएपी खताची खात्री कशी कराल?

डीएपी (DAP) खत देखील मोठ्या प्रमाणात बनावट स्वरूपात विकले जाते. त्यामुळे ते खरे आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. डीएपीचे काही दाणे हातात घेऊन त्यात थोडा चुना मिसळून तंबाखूप्रमाणे चोळल्यास त्यातून तीव्र वास येतो. हा वास आला तर डीएपी खरे असल्याचे संकेत मिळतात. जर वास आला नाही, तर ते खत बनावट असण्याची शक्यता आहे. तसेच डीएपीचे दाणे तव्यावर गरम केल्यास ते फुगतात. हेही खरे डीएपीचे लक्षण आहे. याशिवाय, डीएपीचे दाणे तपकिरी, काळसर किंवा बदामी रंगाचे असतात आणि ते नखांनी सहज तुटत नाहीत. जर दाणे सहज तुटत असतील, तर ते बनावट असण्याची शक्यता आहे.

खत खरेदी करताना ही काळजी घ्या

शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना नेहमी अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. पॅकेजिंगवर कंपनीचे नाव, बॅच नंबर आणि उत्पादनाची माहिती तपासावी. अत्यल्प दरात मिळणाऱ्या खतांपासून सावध राहावे, कारण ते बहुधा बनावट असण्याची शक्यता असते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group