२४ एप्रिल २०२६
"शेती तोट्यात असल्याची ओरड करणाऱ्यांना सोलापूरच्या प्रदीप देशमुखांनी आपल्या कर्तृत्वातून सणसणीत उत्तर दिले आहे. केवळ ७ हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू केलेला गांडूळ खत प्रकल्प आज इतका विस्तारला आहे की, त्यातून मिळालेल्या नफ्यातून देशमुखांनी चक्क ११ एकर नवीन शिवार उभे केले.
पशुपालनाला सेंद्रिय खताची जोड दिली तर प्रगतीचा डोंगर कसा उभा राहतो, पाहुयात त्यांची ही रंजक आणि प्रेरणादायी यशोगाथा!" प्रदीप देशमुख यांच्याकडे सुरुवातीला केवळ दीड एकर वडिलोपार्जित शेती होती. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी पशुपालन सुरू केले. दरम्यान, कोल्हापूरच्या काही जाणकारांनी त्यांना गांडूळ खत प्रकल्पाची संकल्पना सुचवली. त्यावेळी रेशीम शेती करणाऱ्या देशमुखांनी केवळ 7 हजार रुपये खर्च करून दोन बेडपासून या व्यवसायाची सुरुवात केली.
एक बेड तयार होण्यासाठी साधारण अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. आज प्रदीप देशमुख यांचा हा व्यवसाय मोठ्या स्तरावर विस्तारला आहे. गांडूळ खताची विक्री 400 ते 450 रुपये किलो दराने होत असून, सर्व खर्च वजा जाता त्यांना महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे. या व्यवसायातील उत्पन्नातूनच त्यांनी 11 एकर नवीन जमीन खरेदी केली आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला प्रदीप देशमुख यांचा मुलगा देखील याच व्यवसायात त्यांना मदत करत आहे.
देशमुख यांच्या खताला सोलापूर जिल्ह्यासह बुलढाणा, अमरावती आणि इतर भागांतून मोठी मागणी आहे. प्रामुख्याने सेंद्रिय शेती करणारे आणि मत्स्यशेती करणारे शेतकरी हे खत आवर्जून खरेदी करतात. ज्या शेतकऱ्यांकडे पशुपालन आहे, त्यांनी गांडूळ खताचा जोडधंदा केल्यास नक्कीच आर्थिक प्रगती होईल, असा मोलाचा सल्ला देशमुख यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे.
Copyright ©2026 Bhramar