राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अमरावती बाजार समितीत सोयाबीनने प्रथमच हमीभावाचा टप्पा ओलांडल्याचे दिसून आलं. सोयाबीनने तब्बल ५,५५० रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी दर गाठला आहे. या दरवाढीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी अनेक शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळालेला नाही, असे चित्र दिसत आहे.
हमीभावाच्या पुढे बाजारभाव यंदा केंद्र सरकारने सोयाबीनसाठी ५,३२८ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला होता. मात्र, हंगामाच्या सुरुवातीला बाजारभाव ४,५०० रुपयांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. काही शेतकऱ्यांनी दर वाढतील या आशेने माल साठवून ठेवला, तर आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना कमी दरातच विक्री करावी लागली.
आता दर वाढले असले तरी सर्वांनाच त्याचा फायदा झालेला नाही.अतिवृष्टीचा फटका, उत्पादनात घट यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. शेतात पाणी साचल्याने उत्पादनात लक्षणीय घट झाली. परिणामी बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली.
कमी पुरवठा आणि वाढती मागणी यामुळे दराला चांगला आधार मिळाला आणि बाजारभाव वाढू लागले. नाफेड खरेदी उशिरा सुरू, शेतकऱ्यांचे नुकसान सरकारमार्फत नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यात अडचणी आल्या. दर वाढतील की नाही, या अनिश्चिततेमुळे अनेकांनी साठवलेला माल आधीच विकून टाकला. त्यामुळे सध्याच्या दरवाढीचा फायदा मर्यादित शेतकऱ्यांनाच मिळत आहे.
दरवाढीमागची प्रमुख कारणे
सोयाबीनच्या दरात झालेल्या वाढीमागे अनेक घटक कारणीभूत ठरत आहेत. खाद्यतेलाच्या दरात झालेली वाढ, पशुखाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोयापेंड (DOC) दरात झालेली वाढ (४,२०० ते ४,३०० रुपये), तसेच बाजारातील कमी आवक ही मुख्य कारणे आहेत. याशिवाय पावसाळ्यापूर्वी तेल गिरण्यांकडून वाढलेली खरेदी (५,७०० रुपयांपर्यंत व्यवहार) यामुळेही बाजाराला चालना मिळाली आहे.
व्यापाऱ्यांचे मत
अमरावती बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या मते सध्या खाद्यतेलाच्या वाढत्या दरांमुळे सोयाबीनची मागणी वाढली आहे. त्यातच बाजारातील आवक कमी असल्याने दरात तेजी आली आहे आणि पुढील काही काळ ही स्थिती कायम राहू शकते.