नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयाने मोठा हाहाकार निर्माण केला असून या महापुरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली तर हजारो नागरिक बेपत्ता झाले आहेत. दरम्यान याच महाप्रलयात एका चमत्कारीत घटना घडली आहे. या प्रलयात एक अवघ्या ६ वर्षांची चिमुरडी चक्क चिखल, दगड आणि मलब्याखाली तब्बल तीन दिवस अडकली होती. दरम्यान, बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांनी आणि तिच्या बलवान दैवत्याने ती जिवंत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पुराच्या पाण्यासोबत आलेल्या चिखल, दगड आणि मलब्याखाली तब्बल तीन दिवस अडकून पडलेल्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीला बचाव पथकाने जिवंत बाहेर काढले.ही घटना नेपाळमधील रसुवा जिल्ह्यातील तिमुरे गावात घडली. भोटेकोशी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे परिसरातील अनेक घरे आणि इतर बांधकामांचे मोठे नुकसान झाले. बचाव पथक आणि सुरक्षा दलांचे जवान मलब्यात अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत होते.
समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि कंटेनरचा भीषण अपघात ! एकाचा मृत्यू, 10 गंभीर जखमी
शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शोधमोहीम सुरू असताना जवानांना मलब्याखालून अतिशय मंद आवाज ऐकू आला. सुरुवातीला हा आवाज नेमका कुठून येत आहे, हे स्पष्ट होत नव्हते. मात्र जवानांनी काळजीपूर्वक परिसराची तपासणी केली असता तो एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
क्षणाचाही विलंब न करता जवानांनी बचावकार्य सुरू केले. फावड्यांसह आवश्यक साधनांचा वापर करत आणि काही ठिकाणी हातांनीच मलबा बाजूला करत त्यांनी मुलीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अखेर अथक प्रयत्नांनंतर चिमुरडीला जिवंत बाहेर काढण्यात यश आले.
प्राथमिक उपचारानंतर काठमांडूला एअरलिफ्ट
मलब्यातून बाहेर काढल्यानंतर मुलीला तातडीने तिमुरे येथील सीमा चौकीत नेण्यात आले. तेथे तिला प्राथमिक उपचार देण्यात आले. तीन दिवस अत्यंत कठीण परिस्थितीत अडकून राहिल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती.
हवामान खराब असल्यामुळे सुरुवातीला हेलिकॉप्टरद्वारे तिला मोठ्या रुग्णालयात हलवणे शक्य झाले नाही. मात्र बचाव पथकाने तिची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक उपचार सुरू ठेवले. हवामानात सुधारणा होताच तिला हेलिकॉप्टरने काठमांडू येथे नेण्यात आले. सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या थरारक बचाव मोहिमेचे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. अनेकांनी सुरक्षा दलांच्या जवानांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले आहे. एवढ्या दीर्घ काळ मलब्याखाली राहूनही चिमुरडीने जीव वाचवल्याने अनेकांनी या घटनेला चमत्कार म्हटले आहे.
दरम्यान, नेपाळमधील महापुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून मृतांचा आकडा वाढत आहे. हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, तर अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. घरे, रस्ते, पूल आणि विविध पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.