दोन अल्पवयीन मुलांनी एका नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयित दोन अल्पवयीन आरोपींना पुणे पोलिसांनी काही तासांत अटक केली आहे. दरम्यान १५ वर्षांच्या मुलांनाही कोयता सहज मिळत असल्याबद्दल पुणेकरांमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
पुणे शहरातील सिंहगड परिसरात आनंदवन सोसायटी आहे. या खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात नववीत शिकणारा या सोसायटीमध्ये प्रकाश हरिसिंग राजपूत (वय १५) परिवारासह सोसायटीच्या कामगारांचा खोलीत राहतो. सोमवारी शाळेतून आल्यावर जेवण करुन तो झोपला. तो झोपेत असताना दोन अल्पवयीन मुलांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तो घरातून पळत सुटला. मात्र काही अंतरावर तो कोसळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत प्रकाश आणि हल्लेखोर यांची एक मैत्रीण होती. हल्ला करणाऱ्यांपैकी एका मुलाशी ती मुलगी काही दिवसांपासून बोलत नव्हती. प्रकाशच्या सांगण्यावरुन ती मुलगी बोलत नाही, असा त्यांचा समज झाला. यामुळे त्यांनी प्रकाश यालाच संपवल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी वाहनांचे तोडफोडीच्या प्रकरणात सुद्धा मोठी वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त यांनी याबाबत आता कठोर पावले उचलली आहेत.