पुणे : पुण्यातील महर्षीनगर परिसरातील झांबरे पॅलेस शेजारी असणाऱ्या एका तरुणाने स्वतःला घरात कोंडून घेत गॅस सिलेंडर सुरु केला. तसेच वस्तु फेकत धोका निर्माण केला होता. यामुळे परिसरात घाबरत पसरली होती.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नात तरुणाची सुखरुप सुटका करत पोलिसांच्या ताब्यात दिले.

पुण्यातील महर्षीनगरामधील तांबोळी हाऊस या इमारतीत रहिवाशी असलेल्या एकाने स्वतःला घरात कोंडून घेत गॅस सिलेंडर सुरु ठेवला होता. यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. या दृष्टीने अग्निशमन दलाला माहिती मिळताच जवान घटनास्थळी पोहचत माहिती जाणून घेतली. यात इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशी असलेल्या घरामध्ये एका इसमाचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर सुरु ठेवत शेगडीचे बटण सुरु करुन ठेवले असून घरातील वस्तु गच्चीतून बाहेर फेकत आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टीनेट लावली. तर काही जवानांनी गच्चीवर जाऊन घरात प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरु केले. याचवेळी काही जवानांनी स्प्रेडर व घन या उपकरणांचा वापर करुन दरवाजा तोडत आत प्रवेश केला. या जवानांना देखील सदर इसम हा आत येण्यास मज्जाव करत होता.
मात्र जवानांनी आत जाऊन शेगडीचे बटण बंद करत गॅस सिलेंडर बाहेर काढला. तसेच त्याच्याशी संवाद साधत दोरीच्या साह्याने त्याला सुखरुप बाहेर घेत पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान हा तरुण मानसिकरित्या आजारी असल्याची माहिती समोर येत आहे.