कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येप्रकरणी आठ आरोपींना अटक;
कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येप्रकरणी आठ आरोपींना अटक; "असा" रचला होता हत्येचा कट
img
दैनिक भ्रमर

पुणे  (भ्रमर वृत्तसेवा) :- काल कुख्यात गुंड शरद मोहोळची  भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरचा देखील समावेश आहे. गेल्या एक महिन्यापासून हा हत्येचा कट शिजत असल्याचे समोर आले आहे. शरदच्या जवळचीच माणसे यात सहभागी होते.

10 वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून हा खून करण्यात आला आहे. कोथरुडच्या सुतारदरा परिसरातुन  मोहोळ लग्नाचा वाढदिवस असल्याने दर्शनासाठी बाहेर निघाला होता. तेव्हा त्याच्यावर दुपारी दीड वाजता हल्ला झाला. 

शरद मोहोळच्या लग्नाच्या वाढदिवशी  त्याच्या आयुष्याची दोरी कापली गेली. शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालायला लागले. 

सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही पावले चालला असेल तोच याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या. एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. काही कळायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्‍वात गेली दीड दशके दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला.  

शरद मोहोळला गोळ्या झाडणारे तीन मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारासह सुतारदरा भागातून पळाले. त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक एक्सव्हीयू गाडी घेऊन हजर होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून या आठ जणांनी साताराच्या दिशेने वाहनातून पळायचे ठरवल होते.  मात्र त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन पुणे पोलिसांनी लागलीच त्यांचा पाठलाग सुरु केला आणि शिरवळ जवळ पाठलाग करून आठ जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.

शरद मोहोळचे हे मारेकरी त्याचे साथीदार म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या टोळीत काम करत होते. यातील साहील पोळेकर हा तर हत्येच्या आधी काहीवेळ शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात देखील सहभागी होता. वरवर शरद मोहोळचे साथीदार असल्याचे दाखवणारे हे मारेकरी शरद मोहोळवर नाराज होते.

विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणे होती. तर साहील पोळेकर याच्यासोबत देखील जमीन आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते. त्यातून त्यांनी शरद मोहोळच्या हत्येची योजना आखली आणि अतिशय थंड डोक्याने ती अंमलात आणली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group