बोपदेव घाटात एका 21 वर्षांच्या तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना जाती असतानाच पिंपरी चिंचवडमध्येही एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. चार महिन्यांपूर्वी 12 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली होती. या आत्महत्येमागचं खरं कारण आता समोर आले आहे.
दरम्यान तिच्या पालकांना हे समजल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन मुलांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे, अशी दोन मुलांची नावे आहेत.
6 जून 2024 रोजी 12 वर्षांच्या मुलीने साधारण 7.30 वाजण्याच्या सुमारास तिच्या राहत्या घरातील बेडरुममध्ये दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली होती. मुलीने आत्महत्या का केली याचा काहीच उलगडा होत नव्हता. मुलीचे वडिल हे चहाची टपरी चालवतात. त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही चेक केले. तसंच, मुलीच्या खिशात एक मोबाइल नंबरही आढळला होता. या दोन महत्त्वाच्या पुराव्यावरुन त्यांनी मुलीच्या गुन्हेगारांना शोधून काढलं आहे.
मुलीने आत्महत्या केल्यानंतर वडिलांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्याच बरोबर मुलीच्या वडिलांना मुलीच्या खिशात एक मोबाईल क्रमांकही आढळला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही दोन मुले वारंवार घराजवळ येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. तेव्हा त्यांनी पोलिसांत दोघांविरोधात तक्रार केली. मुलीने रोडरोमियोच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. वारंवार पाठलाग करुन तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
मुलीच्या वडिलांनी 7 ऑक्टोबर रोजी पोलिसांत दोघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोन आरोपींना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.