पुणे शहरामध्ये खूनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून बुरखा घालून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करत कर्वेनगर परिसरात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कर्वेनगर येथे उच्चभ्रू श्रीमान सोसायटीमध्ये एका इसमाचा रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून तिक्ष्ण हत्याराने वार करुन खून करण्यात आला आहे. राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय, 42) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुरखा घालून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी राहुल निवंगुने यांच्यावर हल्ला चढवला, या हल्ल्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
रात्री एक वाजण्याच्या सुमारास राहुल पंढरीनाथ निवगुंने यांच्या घराचा दरवाजा अज्ञात इसमांनी वाजविला. इतक्या रात्री कोण आले असे म्हणून राहुल याने दरवाजा उघडला असता आरोपीने त्यांचावर थेट धारदार शस्त्राने सपासप वार केले. यावेळी राहुल यांनी आरडाओरडा केल्या नंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या होत्या पण आरोपी तोपर्यंत घरातील दागिने आणि रोख रक्कम,किंमती वस्तुची लूट करुन पसार झाले आहे.
दरम्यान, राहुल हे एका खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करत असुन त्यांना तीन मुली,पत्नी आहे. आरोपींनी तोंडावर बुरखा असल्याने मुलींनी आरोपीनां पाहूनही ओळखता आले नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.