पुणे : शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत असताना शहराला ड्रग्जनेही विळखा घातल्याचे दिसत आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वीच १ कोटीचे अफीम जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता राजस्थानमधील तरुणाकडून ५८ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , लोहगाव परिसरात पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करताना राजस्थानमधील एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ५८ लाखांचे मॅफेड्रोन आणि हेरॉइन जप्त केले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-दोनच्या पथकाने ही कारवाई केली.
गोपीचंद रामलाल बिश्नोई (वय २८, रा. चऱ्होली, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मूळचा राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील पुनासा भिनमाल येथील रहिवासी आहे. लोहगाव परिसरात एकजण मॅफेड्रोन आणि हेरॉइन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून गोपीचंद बिश्नोई याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडून ५८ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात सुमारे ४७ लाख रुपये किमतीचे ३१२ ग्रॅम हेरॉइन आणि ११ लाख रुपये किमतीचे ५४ ग्रॅम मॅफेड्रोनचा समावेश आहे. या प्रकरणी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.