"आज रात्री 9.30 वाजता तुमच्या घराची लाईट जाईल" ; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : सोशल मीडिया म्हणजे, महाजाल, असं गमतीनं म्हटलं जातं, पण कधी-कधी सर्वसामान्याना हे मायाजाल गुरफटून टाकतं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमुळे असंच काहीसं झाल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज वेगानं व्हायरल होत आहे. 'प्रिय ग्राहक, आज रात्री 9.30 वाजता तुमच्या घराची लाईट जाईल', एवढाच हा मेसेज आहे. देशभरातील अनेकांच्या मोबाईलवर हा मेसेज पोहोचला

यामुळे अनेकांच्या चिंतेत भर पडली. पण आता घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण, याप्रकरणाची दखल आता विद्युत विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली आहे. तसेच, याप्रकरणी एक खुलासाही जारी केला आहे. 

विद्युत विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सरकारनं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजची सत्यता तपासली. त्यामध्ये व्हायरल होणारा मेसेज पूर्णपणे चुकीचा असल्याचं आढळलं. हा संदेश केवळ लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी होता, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? 

विद्युत विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, "आम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजचा तपास केला. त्यामध्ये हा मेसेज चुकीचा आणि खोटा असल्याचं निष्पन्न झालं आहे. या मेसेजला कोणताही आधार नाही. आमच्या टीमनं तत्काळ हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवलं आहे. याप्रकरणी पुढचा तपास सायबर सेल करणार आहे. हा मेसेज कुठून आला? कुणी पाठवला? याचा तपास सायबर सेल करणार आहे. त्यामुळे आम्ही लोकांना आवाहन करतो की, त्यांनी अशा बनावट मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी केवळ अधिकृत सूचनांवरच अवलंबून राहावं. 

बनावट मेसेज पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. सायबर सेलनं काही नंबर ओळखले असून संबंधित लोकांची चौकशी केली जात आहे. हा संदेश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वेगानं पसरत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

सर्वांनी सावधगिरी बाळगावी, विद्युत विभागाकडून आवाहन 

विद्युत विभागानं जनतेला सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून, त्यांना असा कोणताही संदेश आल्यास त्यांनी तत्काळ विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून त्याची माहिती द्यावी, असं सांगितलं आहे. तसेच विभागानं सर्व राज्यांतील वीज मंडळांना त्यांच्या ग्राहकांना अशा अफवांची जाणीव करून देऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमुळे फेक न्यूज आणि अफवा किती वेगानं पसरतात आणि लोकांना यामुळे किती मनस्ताप होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सरकार आणि संबंधित विभागांच्या तत्परतेनं आणि कठोरतेमुळे जनतेला यावेळी दिलासा मिळाला आहे. पण सर्वसामान्य नागरिकांनीही सतर्क राहून अशा बातम्यांची सत्यता तपासणं गरजेचं आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group