नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- अमेरिकेतील नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणारे कॉल सेंटर सारबर पोलिसांनी उद्वस्त केले आहे.
अमेरिकेतील रहिवाशांना त्यांच्या संगणकात बिघाड झाल्याचे अथवा व्हायरस असल्याचे बनावट नोटीफिकेशन पाठवून संगणक दुरुस्तीसाठी वेगवेगळी कारणे सांगून 2 लाख 40 डॉलर्सची म्हणजेच 2 कोटी 6 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मनीष उत्तम धनवटे यांनी फिर्याद दिली आहे.
अशी करायचे फसवणूक
अश्विननगरमधील जानकी बंगल्यात पहिल्या मजल्यावर बुक शेल्फ वाटेल, असा दरवाजा बनवून त्या ठिकाणी कोणाच्या लक्षात येणार नाही, अशी व्यवस्था आरोपींनी तयार केली होती. नाशिकच्या सायबर पोलिसांनी बारकाईने निरीक्षण करून तो दरवाजा शोधून काढला. आत पाहणी केली असता पाच पुरुष व एक महिला 12 लॅपटॉप, सर्व्हर व 13 मोबाईलसह कॉल सेंटर चालवीत असल्याचे पोलिसांना दिसले.
ते अमेरिकन नागरिकांना त्यांच्या संगणकावर अॅपल व मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडून आलेले असे भासणारे संगणकामध्ये बिघाड झाल्याचे किंवा गंभीर व्हायरसचे आक्रमण झाल्याचे नोटीफिकेशन पाठवत होते. त्यामध्ये त्यांना + 184498449736 या फोन क्रमांकावर फोन करण्याचे सांगत कॉल सेंटरमधून संगणकामधील बिघाड दूर करण्याकरिता दोनशे ते दोन हजार डॉलर्सचे गिफ्ट व्हाऊचर जवळच्या दुकानातून खरेदी करण्यास व त्या व्हाऊचरवरील क्रमांक व्हीओआयपी कॉलवरून कळविण्यास सांगत होते. अशा प्रकारे त्यांनी डिसेंबर 2023 पासून आजपर्यंत सुमारे शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांची अंदाजे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिसांनी काल प्रणय अनिरुद्ध जयस्वाल (वय 30, रा. नालासोपारा), साहिल खोकेन शेख (वय 24, रा. मालाड पश्चिम), मुकेश गजानन पालांडे (वय 40, रा. नालासोपारा पूर्व), आशिष प्रभाकर ससाने (वय 28, रा. सांताक्रूझ पूर्व, मुंबई), चांद शिवदयाल बर्नवाल (वय 27, रा. मिरा रोड, पूर्व), सादिक अहमद खान (वय 24, रा. मालाड पश्चिम), समीक्षा शंकर सोनावले (वय 24, रा. खर्डीपाडा, ठाणे) यांनी बिपीन साऊ व रॉन ऊर्फ शादाब (दोघांचेही पूर्ण पत्ते माहीत नाहीत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली असन, दोन जण फरारी आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.