महाबळेश्वर येथे ऑनलाइन हॉटेल बुकिंग करणे एका उच्चशिक्षित तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. सायबर चोरट्यांनी परस्पर तरुणीच्या बँक खात्यातून तीन लाख पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे.
याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. वाघोली येथील उच्चशिक्षित तरुणीला ख्रिसमसनिमित्त महाबळेश्वरला जायचं होतं. त्यासाठी महाबळेश्वरमध्ये राहण्यासाठी तिला हॉटेलची गरज होती. त्यामुळे तिने ऑनलाईन माहिती घेत द कीज हॉटेलमध्ये रूम घेण्याचे निश्चित केले.
त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधत हॉटेलचे कर्मचारी बोलत असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेतली. तरुणीच्या खात्यातून परस्पर तीन लाख पाच हजार रुपये लंपास केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर क्राईम अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून लोणीकंद पोलीस स्थानकाचे पोलीस अधिक तपास करत आहेत.