पार्ट टाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६६ लाखांची फसवणूक
पार्ट टाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून ६६ लाखांची फसवणूक
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :  वर्क फ्रॉम होम व पार्ट टाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका तरुणासह 11 जणांची सुमारे 66 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पंकज मगन धामणे (वय 34, रा. नवश्या हाईट, कर्मयोगीनगर, नाशिक) व त्यांच्यासह इतर 11 साक्षीदार हे नोकरीच्या शोधात होते. या सर्वांनी मिळून ऑनलाईन पोर्टलवर जाऊन नोकरी शोधण्याचे प्रयत्न सुरू केले.
                                                                                      
त्यादरम्यान काही अज्ञात सायबर भामट्यांनी फिर्यादी धामणे यांच्यासह इतर 11 साक्षीदारांशी ऑनलाईन संपर्क साधला. या सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा विश्वास संपादन करून त्यांना वर्क फ्रॉम होम व पार्ट टाईम जॉब ऑनलाईन मिळवून देण्याचा बनाव रचला. फिर्यादी व त्याचे इतर साक्षीदार हे बेरोजगार असल्याने त्यांना सायबर भामट्यांनी सांगितलेला मुद्दा पटला. 

त्याप्रमाणे आरोपींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये फिर्यादी धामणे व त्यांच्या इतर 11 साक्षीदारांनी दि. 13 जानेवारी 2023 ते दि. 14 मार्च 2024 या कालावधीत इंटरनेट व फोनद्वारे एकूण 65 लाख 62 हजार 881 इतकी रक्कम ऑनलाईन वर्ग केली; मात्र बरेच दिवस उलटूनही वर्क फ्रॉम होम व पार्ट टाईम जॉब मिळत नसल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.

यावरून आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर धामणे यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.



इतर बातम्या
Join Whatsapp Group