टेलिग्रामवर लिंक पाठवत नाशिकमध्ये विविध घटनांत एकुण 60 लाखांची फसवणूक
टेलिग्रामवर लिंक पाठवत नाशिकमध्ये विविध घटनांत एकुण 60 लाखांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर
नाशिक (प्रतिनिधी) :  टेलिग्रामवर लिंक द्वारे टास्क देत विविध घटनांत नागरिकांची सुमारे 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

पहिल्या घटनेत शेअर्स ट्रेडिंग करण्याचे, तसेच वर्क फ्रॉम होमचे आमिष दाखवून अनोळखी टेलिग्रामधारकाने एका वृद्धासह तीन जणांना सुमारे 47 लाख रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सायबर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मदन रामभाऊ काळे (वय 60, रा. श्री ॲव्हेन्यू अपार्टमेंट, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा), तसेच जगदीश देवराम कुटे व पवन लक्ष्मण कदम यांना एका टेलिग्राम व व्हॉट्सॲपधारक अज्ञात इसमाने संपर्क साधला.

फिर्यादी काळे यांच्यासह कुटे व कदम यांना त्यांनी शेअर्स ट्रेडिंगमध्ये भाग घेऊन वर्क फ्रॉम होम केल्यास भरपूर नफा मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अज्ञात भामट्याने फिर्यादीसह तिघांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून टेलिग्राम आयडी, चॅनल, तसेच एक लिंक पाठविली. त्यावर लिंक ओपन करून टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यानुसार या तिघांनीही हे टास्क पूर्ण करण्यास सुरुवात केली, तसेच शेअर्स ट्रेडिंग करण्याचे व वर्क फ्रॉम होम करण्याचे सांगितले. 

लिंक ओपन करून अज्ञात टेलिग्रामधारक, तसेच वेगवेगळ्या नावांनी ग्रुप तयार करून त्यात सहभागी व्यक्तींनी फिर्यादी काळे यांच्यासह कुटे व कदम यांच्याकडून दि. 25 नोव्हेंबर 2023 ते दि. 2 जानेवारी 2024 या कालावधीत इंटरनेट व फोनद्वारे वेळोवेळी 46 लाख 45 हजार 878 रुपयांची स्वीकारून वर्क फ्रॉम होम न देता, तसेच शेअर्स ट्रेडिंगमधील नफ्याची रक्कम न देता आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. दुसऱ्या घटनेत महिलेच्या मोबाईलवर टेलिग्राम लिंक पाठवून अज्ञात मोबाईलधारकाने तिच्या बँक खात्यातून साडेबारा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी 32 वर्षीय महिला अंबड परिसरात राहते. या महिलेच्या मोबाईलवर 6385584717 या क्रमांकाच्या अज्ञात मोबाईलधारकाने दि. 18 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास एक टेलिग्राम लिंक पाठविली. ही लिंक फिर्यादी महिलेने ओपन केली असता त्यातील ॲक्सेस मिळवून अज्ञात मोबाईलधारक व टेलिग्राम आयडीधारकाने महिलेच्या बँक खात्यातून परस्पर 12 लाख 50 हजार 177 रुपयांची रक्कम काढून घेत फसवणूक केली.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नजन करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group